2 लेहला बदली -

 

2 लेला ली -


                 भारतीय पोलीस सेवेतील (भा.पो. से. - - IPS) ऑफिसरशी - प्रवीण दीक्षितांशी लग्न केलं आणि ‘बदली’ नावाच्या जादूच्या चटईने आम्हाला अदृष्टपूर्व, अद्भुत अशा ठिकाणांची सफर घडवायला सुरवात केली. 1986-1989 ला मुंबईच्या पेडररोडची उपवाहिनी असलेल्या गामाडिया रोड वर एका मस्त आलिशान (सरकारी कृपेनी मिळालेल्या ) प्लॅटमध्ये आम्ही राहत होतो. इटालियन टाइल्सनी बनविलेलं गालिचासारखं प्लोअरिंग, पितळी कड्यांचा सागवानी झोपाळा, कणादशी- - आमच्या मुलाशी - - - क्रिकेट खेळायचं म्हटलं तर पीच तयार होईल इतका विस्तीर्ण हॉल, सुंदर डायनिंग हॉल, मोठाले टब्स सामावून घेणार्‍याया बाथरूम्स, हवेशीर किचन,सर्व्हंट क्वार्टर,मोठ्या मोठ्या स्टोअररूम्स अशा सर्व अद्ययावत् सोयींनी घर परिपूर्ण होतं. अस्स घर सुरेखबाई खेळाया मिळतं’ म्हणत  आम्हीही धम्माल करून घेतली. बाँबे स्कॉटिश सारख्या नावाजलेल्या शाळेत कणादला इयत्ता 1ली साठी अ‍ॅडमिशनही मिळाली आणि त्याच बरोबर पोहण्यात प्रावीण्यही! कधी वरळीचा तरणतलाव तर कधी CCI चा तलाव आमची वाटच पाहत असयचा.सात समुद्र पोहून जाणारा तारानाथ शेणॉय सारखा उत्तम कोच कणादला पोहतांना वारंवार थांबवून त्याच्या चुका दूर करायचा. महालक्ष्मीच्या रेसकोर्सवर amature’s rider’s club नी कणादला riding चाही अनुभव दिला. चमकणर्‍या कातडीच्या Black beauty वा  Chestnut brown अबलख  वारूंना वार्‍याच्या वेगानी धावतांना पाहून आम्हीही रेसकोर्सवर  पाय मोकळे करून घेतले. शेमारुसारखं वाचनालय हितगुज करायला लाभलं. तिथल्या American Virtue Series  किंवा Noddy च्या पुस्तकांनी कणादच्या बालमनाला अलिबाबाच्या गुहेसारखं पुस्तकांच्या दुनियेत नेलं. नंतर कित्येक दिवस मावशीकडून खास बनवून घेतलेली नॉडीसारखी टोकाला घुंगरू लावलेली टोपी घालून मान उत्तर दक्षिण हालवत घुंगराचा खुळखुळ आवाज करत तो हिंडे. मरिन लाइन येथील बाल भवननी कणादला चित्रकला आणि अभिनयाचे धडे द्यायचा प्रामाणिक प्रयत्न केला.  मनात येईल त्या ठिकाणी मनात येईल तेंव्हा  न्यायला ‘बा आदब बा मुलाहिजा’ म्हणत बेस्ट चा कंडक्टर बेस्टच्या दरवाजातच उभा असे. रानात मोकळया सुटलेल्या  बकरींनी दिसेल त्या झाडाची पान ओरबाडावीत तसं मिळतील त्या गोष्टी शिकण्यासाठी, करण्यासाठी आम्ही मनसोक्त बागडत होतो. आणि बघता बघता दोन वर्ष भुर्रकन उडून गेली. लहानपणी आई आम्हाला श्रावणात कहाण्या सांगायची. त्यात शंकराची भक्ती करणार्‍या राजाच्या राणीची गोष्ट असे. माहेर नसलेल्या या राणीनं औट घटकेचं माहेर शंकराकडून मागून घेतलं.  प्रवीणच्या भारतीय पोलीस सेवेने  आम्हाला दिलेलं औट घटकेचं मुंबईचं माहेर सोडायची वेळ येऊन ठेपली होती.  आता बदली नावाच्या जादूच्या चटईने मुंबईच्या समुद्रसपाटीवरून आम्हाला थेट आकाशाला हात टेकवायला लेह-लद्दाख मधेच घेऊन जायचं ठरवलं.

                  मुंबईत  भर डिसेंबर जानेवारीतही फुल्ल पंखे लावून घाम पुसायची सवय झाली होती. घामघाम चिकचिक हे शब्द दोन वर्षात अंगवळणी पडून गेलें होते. हवेतील 80 -85 टक्के बाष्पामुळे होणरी तगमग सवयीची वाटत होती.तापमान अणि बाष्प ह्यामुळे येणार्‍या बुरशी,गंज,दमटपणा ह्यांचा गाढ परिचय झाला होता. पावसाळ्यात चुकून डब्याबाहेर राहिलेला किंवा घट्ट झाकणाच्या डब्यात न ठेवलेला गूळ द्रवरूप असतो. तो चमच्या चमच्यानी पदार्थात घालायचा असतो;  आणि बाहेर राहिलेले पापड पोळ्यांसारखे घडी घालून ठेवता येतात हे प्रयोग अनेकवेळा केले होते.  धोऽधोऽधोऽधो पावसात छत्री बंद करून मरीन ड्राईव्हवरून धावत सुटायचं असतं अणि सोसाट्याच्या वार्‍यामुळे छत्री उलटून बंद झाली नाहीच तर तिचा खिळखिळा झालेला सांगाडा मोकळ्या मनाने  रस्त्यावरच्याच कचर्‍याच्या टोपलीत टाकून द्यायचा असतो हे कुणी सांगायची गरज राहिली नव्हती. समुद्रावर पाण्याबरोबर पाणीपुरी असतेच हे गृहीतच होत. घरी जेवण नाही बनवलं  तरी सर्व हॉटेल मालकांना आपल्या नवर्‍याची काळजी असते त्यामुळे `बिनधास` माहेरी जायला हरकत नसते असं अलिखित आश्वासन हॉटेल मालकांच्या संघटनेनी देऊन टाकलं होतं. धमन्यांमधून रक्त वाहतं तसं लोकल मधून माणसं वाहतात म्हणूनच मुंबैत जोश दिसतो. हे अनुभवाचे बोल अनुभवले होते.  दिवसाच्या कुठल्याही प्रहरी रस्यावर आपल्या आजूबाजूला धावणार्‍या माणसांचं जग हेच जग असतं ही खात्री झाली होती. मुबैचा बेस्टचा चालक जगात कुठेही गाडी चालवू शकेल ह्याची मनात देखील शंका नव्हती. अंधाराला अस्तित्व असतं हे मान्यच नव्हतं. सूर्य मावळला की रस्त्यावर दिवे आपोआप लागतात अशी धारणा झाली होती. रस्त्याच्या आकाराप्रमाणे वरचं आकाशही पट्या पट्यांमधेच अस्तित्वात असतं हे प्रत्यक्ष दिसत होत. स्वर्गात न मिळणार्‍या गोष्टी घ्यायला इंद्रसुद्धा हळूच मुंबईच्या मायाबाजारात फिरून जात असावा असा विचार मनात आल्याशिवाय रहात नसे.

             ह्या सर्व मुंबईच्या पार्श्वभूमीवर लडाखची बदली ही शब्दशः जमिन अस्मानाचं अंतर म्हणजे काय हा प्रत्यक्ष अनुभवच होता. साधारण 25-26 (89 -90 सालची गोष्ट) वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेंव्हा फारसं कोणाला लेहही माहीत नव्हतं आणि कारगील तर त्याहूनही नाही. अनेकांनी तर चीनमध्ये आमची बदली झाली म्हणून सबुरीचा सल्ला दिला तर कोणी फॉरिन पोस्टिंगबद्दल अभिनंदन केलं. कोणी लडाख पासून लेह किती अंतरावर आहे असंही विचारलं.

               आत्तासारखी  internet, google search प्रचलित नव्हते. cell phone, mobile,  computer, email ही नावंही ऐकिवात नव्हती. लोकं सांगतील तेवढयाच माहितीवर अवलंबून रहावे लागे. भारताच्या नकाशावर निरनिराळी शहरं आणि राजधान्या दाखविणार्‍या थेंबा ठिपक्यांची भाऊगर्दी उडालेली असे. पण भारताच्या शिरपेचात श्रीनगर, लेह, गिलगिट एवढे तीनच ठिपके दिसायचे आणि कंठात जम्मू! ह्या सर्वात दूरच्या गिलगिटच्या ठिपक्याला भेटायला मिळणार म्हणून मी हरखून गेले होते. (प्रत्यक्ष लेहला गेल्यावरच गिलगिटचा हट्ट अवास्तव असल्याचं लक्षात आलं. ) ऑफिसमधेही लेहशी परिचित लोकांकडे प्रवीणनी चौकशी करायला सुरवात केली. बरीच माहिती कळली. पण त्यावेळी खास वाटलेली माहिती अशी होती. -

               लेह खूप उंचीवर असलेले अति थंड गाव आहे. तिथे रहायला सरकारी घर आहे (ही सर्वात आश्वस्त करणारी माहिती). ज्या नदीच्या नावावरून भारताला हिंदुस्थान नाव पडलं ती सिंधू नदी आता फक्त लडाखमधेच आहे. सप्टेंबरनंतर तिथे जाणारे मोटार-वे बंद होतात. आम्ही तर सप्टेंबरमधेच जात होतो. म्हणजे बाय रोड न जाता आम्हाला चंडीगडहून विमानानी जाणंच भाग होतं. विमानप्रवास तेंव्हा एवढा रोजचा झाला नव्हता. त्याचं अप्रूप टिकून होतं. लेहला जायचं तर लडाखी भाषेतील एक शब्द शिकूनच जा असं सगळ्यांनी सांगितलं होतं. तो म्हणजे ‘जुले!’- - - नमस्कार!

 

                    दिल्ली लेह विमानसेवाही आहे पण चंडीगडला लेहच्या Indo Tibetan Border Force (I.T.B.F) चं rear headquarter होतं. `I.T.B.F commandant' म्हणून प्रवीणची ले ला नेमणूक झाली असल्याने चंडीगडला जाऊन तिथल्या ऑफिस स्टाफला भेटून  मगच पुढे जाणं आवश्यक होतं. चंडीगडला एक आठवडाभर थांबून आम्ही पुढे जाणार होतो. चंडीगडच्या ऑफिसच्या लोकांनीही कळवलं की गरम कपडे मुंबईपेक्षा इकडेच जास्त बरे मिळतील आणि ते खरंही होतं. लेहच्या अज्ञानामुळे, तिथे योग्य मापाचे कपडे मिळतील न मिळतील ह्या आशंकेनी आम्ही चंडीगडलाच स्वेटर, टोप्या, जाकिटं, गरम पँटस्, कॉटस्वुलचे शर्ट, हातमोजे, पायमोजे सर्व काही विकत घेतलं. आमच्या लग्नाच्या शालू, शेले, शेरवान्यांवरही केला नसेल  एवढा खर्च आम्ही स्वत:च्या फुकटच्या आराशी आणि सजावटीवर खर्च केला. आम्हाला काय माहीत होतं की आम्ही घेतलेले सुंदर सुंदर कपडे आम्हाला लेहच्या थंडीत फक्त इनर्स म्हणूनच वापरायला लागतील. परत लेहला गेल्यावर आमचा शॉपिंगचा दुसरा हप्ता होणार होता. ज्या मातीतला आजार त्याच मातीतला उपचार हेच खरं होतं. आम्हाला परत एकदा सर्व कपडे नव्यानी खरेदी करावे लागणार होते  अगदी बुटांसकट! कणाद खूश होता कारण बॉम्बे स्कॉटिशच्या मॅडम दर सुट्टी आली की मुलांना विचारीत, ‘ सुट्टीत कुठे जाणार’? बहुतेक मुलं पॅरिस, लंडन, वॉशिंग्टन अशी प्रभावळवाली नावं सांगत. कणाद उत्साहानी हात वर करुन मॅडमना सांगायच्या आत, मॅडम सिक्वेरा म्हणत,- “माहीत आहे तू पुण्याला आजीकडे जाणार आहेस”. आज काहीतरी वेगळं घडत होत. त्याचा हा पहिलाच विमानप्रवास होता.



----------------------------------

नाते लडाखशी (अरुंधती प्रवीण दीक्षित)  अनुक्रमणिका

Comments

Popular posts from this blog

नाते लडाखशी

1 नाते लडाखशी (प्रस्तावना -)