31 त्सोमुरीरी –
31 त्सोमुरीरी –
शाळेत उत्साहा उत्साहाने माझ्या मैत्रीणींना मी सांगत
होते - “ उद्या मी सोमुरारी लेक पहायला जाणार
आहे आणि आंगमो - -आमची स्थानिक लडाखी मैत्रीण खुद्कन हसली “सोमुरारी नाही त्सोमुरीरी!” “म्हणजे काय?
काय अर्थ आहे त्सोमुरीरीचा? ” - मी.
हसत हसत ती म्हणाली “ह्या नावामागे एक छोटीशी
गोष्ट आहे. थंडीत इथले तलाव गोठतात तेंव्हा
त्सोमु नावाची मुलगी (आपल्याकडे गोमु असते इथे त्सोमु असावी )आपल्या शेळ्यांचा कळप
‘री री री रीऽऽऽऽ ’करत हाकत त्या गोठलेल्या तलावावरून जात होती. मध्यात तलाव पूर्ण
गोठला नव्हता. वरवरचा थरच फक्त बर्फ झाला होता. आणि अचानक त्या बर्फावर पाय पडून ती
त्या पाण्यात पडली.” - - - म्हणून त्याला त्सोमुरीरी म्हणतात. परत एकदा नावामागे गोठवून
टाकणारी गोष्ट दडलेली सापडली. कदाचित सगळ्या मेंढपाळ मुलामुलींना दिलेला तो धोक्याचा
इशारा असावा. जपून! हा त्सोमुरीरी आहे कधी पोटात घेईल सांगता येत नाही. लडाखमधे लोकवस्ती
कमी असली तरी अनेक झरे, तलाव, अगदि दगडधोंड्यांना सुद्धा खुणेची नावं मिळाली असावीत.
प्रत्येक नावाच्या स्पंदनातून जपून जा- -जपून जा असा संदेश ती सतत देत असतात. ह्या सरोवराच्या रस्त्यावर असंख्य निर्झर बागडत
जात होते. ठिकठिकाणी गाडी थांबवून अनेक चमकदार दगड गोळा करण्याचा मोह आम्हाला आवरता
येत नव्हता. निर्झरांच्या जवळ उगवलेल्या खुरट्या गवतावर अनेक मेंढपाळ आपल्या मेंढ्या
घेऊन फिरत होते. मला त्सोमुची कहाणी खरी असावी हे पटलं.
“सर लेक बघा; लेक बघा!”
बरोबर असलेले स्रिंग दोर्जे आम्हाला गाडीतूनच सरोवर दाखवत होते आणि मी “कुठंय? कुठंय”?म्हणून
शोधत होते. “हे काय समोर”! आणि पहाता पहाता अचानक लक्षात आल! - - सरोवराच्या पाठीमागच्या
खाकी पिवळ्या मातकट पर्वतांचं प्रतिबिंब त्यात इतकं स्पष्ट उमटलं होतं की समोर जमीनच
पसरली आहे असा भास होत होता. कदाचित् मी गाडी चालवत असते तर त्सोमुसारखी सरळ गाडी चालवत
तलावातच पडले असते. त्यासाठी तलाव गोठायचीही आवश्यकता नव्हती. जसजसं जवळ जात होतो तसतसं
आकाशाचं प्रतिबिंबही त्यात स्पष्ट दिसायला लागलं. इथले तलाव म्हणावे का बिलोरी आरसे!
पँगाँग त्सोला गेलो तर आकाशाचा तुकडाच कापून खाली ठेवल्यासारखा दिसत होता तर आता आख्खी
डोंगराची रांगच खाली डोकं वर पाय करून पाण्यात शीर्षासन करत उभी होती. निर्सगाने तयार
केलेली मयसभा मोठी अद्भुत होती.
--------------------------------
Comments
Post a Comment