33 शे चा राजवाडा (Shey Palace) -

 

33 शे चा राजवाडा (Shey Palace) -


              ले पासून 15 कि.मी. वर असलेला 9 मजली शे चा राजवाडा लडाखमधलं मोठं आश्चर्यच म्हटलं पाहिजे. 1655 साली ‘देलदन नामग्याल’( द चा उच्चार ड कडे झुकणाराच असतो) या राजाने बांधलेला हा राजवाडा. आश्चर्याचं कारण म्हणजे ह्या सर्व वास्तू दगड आणि मातीमधे बांधल्या आहेत. आणि इतका पूर्वी बांधलेला असून आजही त्याचे सर्व मजले शाबूत आहेत.  पूर्वी शे हीच लडाखची राजधानी होती. पण जम्मूच्या डोग्रा राजाने हल्ला केल्यावर राजानी शे सोडून स्तोक येथेच कायमचं  वास्तव्य केलं. लेहून निघतांना गाडीनी हेमिस गोंपा कडे जाणारा किंवा ठिकसे गोंपाकडे जाणारा मनाली रस्ता धरला की वाटेतच राजवाडा लागतो. राजवाड्याजवळच वाटेत छोटसं तळं लागत. त्या तळ्यात ह्या राजवाड्याचं प्रतिबिंब पाहूनच राजाने ह्या राजवाड्याचं नाव शे ठेवलं असावं. ‘शे’ म्हणजे लडाखी भाषेत आरसा! रोज आपलं सौंदर्य ह्या तळ्यात डोकवून पहाणारा हा देखणा महाल आज जीर्ण झाला असला तरी एकेकाळचं त्याचं वैभव दाखविणार्‍या खुणा अंगावर आजही दिसत राहतात. राजवाड्याच्या परिसरातच राजानी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधलेली गोंपाही सुबक आहे. आज धूळमय झालेल्या या राजवाड्यात असलेल्या वस्तुसंग्रहालयात अनेक मौल्यवान् दागिने, तन्खा (scroll-painting) यांची जपणूक केली आहे. बुद्धाचा जीवनपट किंवा बुद्धाच्या आयुष्यातले प्रसंग अथवा बुद्धधर्माविषयी माहिती तन्खामधे चित्ररूपात दाखवलेली असते. जीवनचक्राचं दुःखमय दर्शन घडवणारे प्रसंग बाजूने रेखाटून मध्यभागी जीवनाचं यथार्थ ज्ञान झालेल्या शाक्यमुनी म्हणजेच  भगवान् बुद्धदेवांचं समाधिस्थ रूप अतिशय कलात्मक रीतीनी दाखविलेलं असतं. वेगवेगळ्या देवता आणि काही प्रसिद्ध लामांचा चरित्रपटही तन्खामधून चित्रित केलेला असतो. तन्खा रेशमी किंवा सुती कापडाचे बनलेले असतात. त्याच्यावरची चित्रं ही ऑईलपेंटने किंवा ऍक्रिलिकपेंटने रंगवलेली असतात; किंवा भरतकाम करून ही चित्रं तयार करतात. ऍप्लिकवर्क करूनही हे तन्खा तयार केले जातात. त्यांच्यावरची बारीक कलाकुसर बघण्यासारखी असते. हे तन्खा वर्षानुवर्षं टिकतात. पण तरीही रेशमी असल्याने नाजूक असतात. गुंडाळी करून ते कोरड्या सुरक्षित जागी ठेवलेले असतात. अनेक तन्खा काही विशिष्ट दिवशीच उघडले जातात. काही काही गोंपांमधले तन्खा तर बारावर्षांनी एकदा उघडले जातात.

----------------------------

नाते लडाखशी (अरुंधती प्रवीण दीक्षित)  अनुक्रमणिका

Comments

Popular posts from this blog

नाते लडाखशी

1 नाते लडाखशी (प्रस्तावना -)

2 लेहला बदली -