39 काराकोरम - 40 कारगील ते झन्स्कार -

 

39 काराकोरम -  

                             लद्दाखमधल्या अनेक चार्मिंग धकधक गर्लस् पैकी ही एक! एक फूल दो काटे किंवा एक फूल दो माली सारखं एक खिंड आणि पाच देश अशी चार्मिंग! भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन आणि रशिया ह्या पाच देशांच्या सीमा इथे येऊन मिळतात. त्यामुळे सर्वच देशांच्या कडेकोट बंदोबस्तात असलेली.

पूर्वीपासूनचा सिल्क ट्रेडरूट इथूनच जायचा. दौलत बीन ओल्दी (DBO) हे Indo Tibetan Border police (I.T.B.P.) च आपलं तिकडचं शेवटचं पोस्ट. प्रवीण चॉपरने तिथे जाणार होता.  ह्या सरकारी चॉपरमधे मला परवानगी नव्हती.  आपल्या संस्कृतीत हाताला हात लावायची पद्धत आहे. जिथे आपण जाऊ शकत नाही तिथे चॉपरने पोचू शकणार्‍या नवर्‍यच्या हाताला हात लावून संजयासारखं प्रत्यक्ष रणभूमीवर न जाता सगळा प्रवास मी प्रवीणच्या डोळ्यांनी  पहाणार होते आणि त्याच्या तोंडून ऐकणार होते. अती अती उंच काराकोरम पर्वतराजीतून वाट काढत, प्रतिकूल हवेशी सामना करत, आपल्या पंखांना इजा पोचू न देता हेलिकॉप्टरचा DBO पर्यंतचा प्रवास म्हणजे एक दिव्यच होतं. पंचवीस हजार फूटाच्याहीवर उंच डोंगरांच्या डोक्यावरून जाण्यापेक्षा त्यांच्या मधून मधून जाणंचं हेलिकॉप्टर्सना योग्य वाटे. विरळ हवामानामुळे हेलिकॉप्टर्सना उंची गाठतांना त्रास होई. जातांना ती जोडी-जोडीनी जात.म्हणजे एकाला काही झालं तर निदान दुसर्‍याला त्याची माहिती तरी असावी. दोन्ही बाजूला डोंगरांचे सुळके आणि मधून हेलिकॉप्टर रस्ता काढीत जातांना मधेच समोर अचानक दुसरा सुळका येऊ नये ह्याची काळजी घ्यावी लागे. जमिनीवरून बघतांना हेलिकॉप्टर कितीही रम्य वाटत असलं तरी प्रत्यक्षात त्याच्यात बसणाऱयाला त्याच्या प्रचंड आवाजासोबतच प्रवास करायला लागतो.

40 कारगील ते झन्स्कार -

                            कारगील ते झन्स्कार जातांना नोरबूंनी आम्हाला एका विस्तीर्ण पठारावर थांबवलं. इथे खुरट्या गवतासोबत उगवणार्‍या वनस्पती ह्या फार औषधी आहेत. मारुती संजीवनी जडीबुटी इथूनच घेऊन गेला. आजही ती इथे आहे, पण कोणाला आज त्याचं फारसं ज्ञान नाही. नोरबू सांगत होते. इथल्या अनेक मुळ्यांपासून  खाण्याचे वेगवेगळे रंगही बनतात. लद्दाखी लोक ड्रगॉन आणि इतर चित्र रंगवायलाही हे नैसर्गिक रंग वापरतात. नोरबूं थोड्याच वेळात काही मुळ्या घेऊन आले. त्या मुळ्या हातावर चोळल्यावर गडद लाल किंवा मॅजेंटा म्हणता येईल असा रंग तयार झाला. हा रंग इतका पक्का होता की पुढचे दोन दिवस त्यांच्या हातावर तो दिसत होता. इथले आजूबाजूचे स्थानिक लोक त्यांच्या याकना चरण्यासाठी मुद्दाम इथे घेऊन येतात. त्यामुळे त्यांचं दूध हे जास्त सकस आणि औषधी  होतं. ह्या दुधापासून बनविलेल्या लोण्याला फारच मागणी असते. लोणी बनविण्याची पद्धत मात्र फारच वेगळी होती. पखालीसारख्या एका चामड्याच्या पिशवीत दूध घालून दोन्ही हातात ही पिशवी धरून दाये-बाये, दाये-बाये अशी हलवावी लागते. ह्या हलवण्यामुळे आतलं दुध घुसळलं जाऊन लोणी येतं. हे त्यांच्या गुरगुर नावच्या नमकीन चहाला वापरलं जातं.

                झन्सकारला कामानिमित्त प्रवीणला अनेकदा जावं लागे पण कारगील ते झंन्स्कार ही खिंड फारच थोडे महिने चालू असे. अनेकवेळा त्याला चॉपरनी जाणंच भाग असे. अशावेळी अनेक अडले नडलेले लोक लेला येण्यासाठी चॉपरभोवती रांग लावून उभे असत. कोणी खूप आजारी असे. कोणाचा लेचा नातेवाईक आजारी असे. जास्तीत जास्त दोन तीन लोकांना घेऊन येणं शक्य असे. अशावेळी आजारी, म्हातारे ह्यांना प्राधान्य देऊन इतरांचे हिरमुसलेले चेहेरे बघतांना प्रवीणलाही वाईट वाटे. नंतर इथल्या लोकांच्या मागणीप्रमाणे झन्स्कार ते कारगील चॉपर सेवा सुरू झाली. एकदा कामानिमित्त प्रवीणला झन्स्कारला जायचं होतं. निमूला सिंधु नदीला मिळणारी झंन्स्कार आतापर्यंत गोठून तिचा चादर रस्ता तयार झाला होता. आकाशातून  ह्या चादररस्त्याचा मागोवा घेत सर्वात जवळच्या मार्गाने चॉपरने झन्स्कार व्हॅलीला पोचता येई.  त्याचवेळी तिथल्या शाळेत काही कार्यक्रम होता. प्रवीणला तिथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. बर्फाचा आणि थंडीचा जोरदार अम्मल चालू होता. चॉपरच्या पायलटनी चॉपर खाली उतरवतांनाच सांगीतलं - “प्रवीण, मी वीस मिनिटं देतो. तेवढ्यात परत या. नाहीतर चॉपर बर्फात रुतत जाईल. हे चॉपर एकदा रुतलं तर परत उडणं अवघड”.


-------------------

नाते लडाखशी (अरुंधती प्रवीण दीक्षित)  अनुक्रमणिका

Comments

Popular posts from this blog

नाते लडाखशी

1 नाते लडाखशी (प्रस्तावना -)

2 लेहला बदली -