42 झन्स्कारच्या काठावरील अद्भूत प्रवास नीमू ते ले

 


42 झन्स्कारच्या काठावरील अद्भूत प्रवास नीमू ते ले       

                    दरवेळी वाईटच अनुभव मनात कायमचे कोरले जातात असं नाही तर अमृताच्या निस्यंदिनीसारखे कितीतरी चांगले अनुभव सतत चांगल्या आठवणी तुमच्या मनात झिरपत ठेऊन तुम्हाला आनंदित करतात. फुलावर पडलेल्या दवबिंदूंसाखे काही सुंदर क्षण अचानक भेटून जातात.

                         निमूला 5div च्या जनरलने ठेवलेल्या पार्टीहून परततांना आम्हाला उशीर झाला. बाहेर आलो गाडीत बसलो. गाडीने रस्ता मागे टाकायला सुरवात केली. आकाशभर चांदण्या फुलल्या होत्या. डोंगराच्या मागून पूर्ण चंद्र वर येत होता. त्या तळपणार्‍या चंद्रप्रकाशात जागेपणी एक स्वप्न समोर उलगडत जात होतं. डावीकडे उंच उंच पर्वत रांग चंद्रप्रकाशाच्या शुभ्र झोतांमधे भिजून, संपृक्त होऊन चंद्रप्रकाशाने झिरपत शांतपणे मागे सरकत होती. उजवीकडे दरीतून वाहणार्‍या दर्या झन्स्कार आणि दर्या सिंधूच्या संगमात जलक्रीडा करायला लाख लाख चांदण्या खाली उतरल्या होत्या. चांदण्यांनी भरभरून वाहणारी नदी मनाशीच गाणं गात गात पुढे धावत होती. तिच्या किनार्‍यावरील वाळू चमचम चमकत होती. हजारो फूट खाली असूनही इतकी वर भासत होती की आमच्या गाडीच्याच शेजारून वहात होती जणू!  बोनीएम् च्या कॅसेटमधून I have a dream I saw a scene चे सूर बाहेरच्या वातावरणाशी तादात्म्य पावत होते. आणि आमच्याच हृदयाच्या तारा झंकारत होत्या. शांततेत भरलेलं महान संगीत प्रत्ययाला येत होतं. - - निसर्ग संगीत- -किवा ब्रह्मानुभूती!

---------------------------

नाते लडाखशी (अरुंधती प्रवीण दीक्षित)  अनुक्रमणिका

Comments